Maharashtrasena News : शाश्वत आणि आर्थिक विकास करताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही त्याचा समतोल राखला जाईल हे पाहणं अगत्याचं आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलं. पर्यावरणाच्या दृष्टीनं महाराष्ट्राचं स्थान देशात आगळ वेगळं असून राज्याला निसर्ग संपत्तीचं वरदान लाभलं आहे ती संपत्ती जतन आणि संवर्धन करणं ही काळाची गरज आहे. त्याकरता राज्य सरकार कटीबद्ध असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (World Environment Day) माझी वसुंधरा उपक्रमाअंतर्गत उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. कार्बन उत्सर्जन कमी होईल असे पर्यावरणपूरक पायाभूत प्रकल्प राज्यात सुरू असून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही ह्याची काळजी सरकारकडून घेतली जात असल्याचं शिंदे म्हणाले.
माझी वसुंधरा अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात पंचमहाभूंतांवर काम केलं जात असून या कार्यात स्थानिक स्वराज्य संस्थांचा सहभाग वाढला आहे तसंच या अभियानाअंतर्गत २ कोटीची वृक्ष लागवड करण्यात आल्याची माहितीसुद्धा त्यांनी दिली तसंच राज्यात १६ हजार ७१४ नवीन हरित क्षेत्र तयार केली आहेत असंही एकनाथ शिंदे, (Eknath Shinde)(मुख्यमंत्री) म्हणाले.
सागरी जैवविविधतेचा अभ्यास करणाऱ्या होतकरू तरूणांना प्रोत्साहन देण्याकरता या विषयातील पीएचडीसाठी अभ्यास करणाऱ्यांना शिष्यवृती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं.