पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सिडनीत कंपन्यांच्या सीईओंबरोबर चर्चा | Prime Minister Narendra Modi meets prominent Australian business leaders in Sydney

तीन देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)ऑस्ट्रेलियात सिडनी इथं असून फोर्टेस्क्यु फ्युचर इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. ऍन्ड्रू फॉरेस्ट (Dr. Andrew Forrest) यांनी आज त्यांची सिडनीमध्ये भेट घेतली. याशिवाय ऑस्ट्रेलियन सुपर के चे सीईओ पॉल श्रोडर यांनी देखील पंतप्रधानांची भेट घेतली.

हरित हायड्रोजनच्या क्षेत्रात भारतीय कंपन्यांसोबत काम करण्याच्या फोर्टेस्क्यू समूहाच्या योजनेचं पंतप्रधानांनी स्वागत केलं. तसंच हॅनकॉक प्रॉस्पेक्टिंग ग्रुपच्या कार्यकारी अध्यक्षा जिना राईनहार्ट यांनी देखील पंतप्रधानांची भेट घेतली. पंतप्रधानांनी भारतात सुरू असलेल्या परिवर्तनशील सुधारणा आणि उपक्रम अधोरेखित करत,त्याविषयीची माहिती त्यांना दिली; तसंच खाण आणि खनिज क्षेत्रातील तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि कौशल्य विकासात भागीदार बनण्यासाठी त्यांना आमंत्रित केलं.

ऑस्ट्रेलियामध्ये विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रसिद्ध व्यक्तिमत्वांनी देखील आज पंतप्रधानांची भेट घेतली आणि आपापल्या विचारांची देवाणघेवाण केली. भौतिकशास्त्राचं नोबेल पारितोषिक विजेते आणि कॅनबेरा इथल्या ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय विद्यापीठाचे कुलगुरु प्रोफेसर ब्रायन श्मिड्ट, सामाजिक मुद्यांवर भाष्य करणारे नामवंत वक्ते आणि व्यवसाय तज्ञ मार्क बल्ला, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेल्या शेफ, टीव्ही कार्यक्रमाच्या सूत्रसंचालक सारा टॉड, प्रसिद्ध कलाकार डॅनिएल मेट, ऑस्ट्रेलियन रॉकस्टार गाय सेबॅस्टियन या मान्यवरांचा यामध्ये समावेश होता. या सर्वच मान्यवरांनी पंतप्रधानांना भेटल्यानंतर त्यांच्या व्यक्तिमत्वाची आणि विविध मुद्यांकडे पाहण्याच्या त्यांच्या दृष्टीकोनाची प्रशंसा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज (Anthony Albanese) यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक होणार आहे. ज्यामध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर सविस्तर चर्चा होणार आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज (Anthony Albanese)यांनी पंतप्रधानांसाठी मेजवानीचंही आयोजन केलं आहे. पंतप्रधान आज एका सामुदायिक कार्यक्रमातही सहभागी होणार आहेत. त्यापूर्वी काल सिडनी इथं पंतप्रधानांचं भव्य स्वागत करण्यात आलं. विमानतळावर भारतीय समुदायाचे अनेक नागरिक उपस्थित होते.

 

Prime Minister Narendra Modi meets prominent Australian business leaders in Sydney

Anthony Albanese

Leave a Comment

error: Content is protected !!